समाजासाठी प्रेरणा – सर्वांसाठी विकास, निःस्वार्थ भावना हेच आमचे बळ...
मनमाडच्या प्रेरणाभूमीत विचारवंत दादाभाऊ अभंग यांची तोफ धडाडणार
येत्या आठवड्यात प्रेरणाभूमीला भेट देऊन साधणार जनसंवाद
by - Prernabhoomi Social Media Committee
9/21/20251 मिनिटे वाचा


मनमाडच्या डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रमाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन या भूमीला प्रेरणाभूमी घोषित करण्याच्या लढ्यात आता विचारवंत, स्तंभलेखक आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या जागेसाठी लढा उभारणारे आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार दादाभाऊ अभंग सहभागी होणार आहेत. या ऐतिहासिक भूमीला पुढील आठवड्यात प्रत्यक्ष भेट देऊन ते आंबेडकरी अनुयायांसमवेत संवाद साधणार आहेत.
आंबेडकरी चळवळीच्या अनेक विषयांवर लेखन करणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीतून निर्मित साहित्याचे अभ्यासक म्हणून दादाभाऊ अभंग परिचित आहेत. आपल्या अनेक स्तंभलेखनातून त्यांनी आंबेडकरी चळवळीचे अनेक विषय जनतेसमोर मांडले आहेत.
भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाच्या परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी अभंग यांनी लढा उभारला आहे. बाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या आणि भेट दिलेल्या जागांबद्दल माहिती विशद करणारे अनेक लेख अभंग यांनी लिहिले आहेत. मनमाडच्या प्रेरणाभूमीचा लढा सुरू झाला असून या लढ्यामध्ये सहभाग घेण्यासाठी दादाभाऊ अभंग यांनी पुढाकार घेतला आहे.
मनमाडच्या प्रेरणाभूमी विकास कृती समितीचे प्रतिनिधी अॅड. डॉ. मनीष रणशूर यांच्यासमवेत प्रेरणाभूमीच्या आंदोलनाविषयी नुकतीच अभंग यांची चर्चा झाली. यावेळी अॅड.रोहन गायकवाड, अॅड. धीरज बनसोडे, अरुण पठारे, अनंत राऊत आदी उपस्थित होते.
प्रेरणाभूमी विकास कृती समितीच्या शिष्टमंडळाने राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची भेट घेऊन प्रेरणाभूमी संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. यावर शासनाकडून सकारात्मक निर्णय घेऊन घोषणा करणार असल्याची ग्वाही बनसोडे यांनी शिष्टमंडळाला दिली आहे, अशी सविस्तर माहिती दादाभाऊ अभंग यांनी घेतली.
प्रेरणाभूमीच्या लढ्याचे पुढचे स्वरूप काय असावे याबाबत देखील यावेळी प्राथमिक चर्चा झाली. मनमाडला येऊन प्रेरणाभूमीला प्रत्यक्ष भेट देण्याचा आणि आंबेडकरी अनुयायांसमवेत विस्तृत चर्चा करण्याचा मनोदय अभंग यांनी यावेळी बोलून दाखवला.
त्यानुसार या लढ्यात सक्रीय सहभाग घेण्यासाठी येत्या आठवड्यात अभंग मनमाडला येणार आहेत. या माध्यमातून आंबेडकरी चळवळीच्या इतिहासाची उजळणी होणार असून प्रेरणाभूमीच्या लढ्याची दिशा आणि रणनीती ठरविण्यास मदत होणार आहे.