समाजासाठी प्रेरणा – सर्वांसाठी विकास, निःस्वार्थ भावना हेच आमचे बळ...

मनमाड मधील प्रेरणाभूमीच्या लढ्याला यश; लवकरच शासन सकारात्मक निर्णय घेऊन घोषणा करणार..

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिली ग्वाही

बातमी

by - Prernabhoomi Social Media Committee

9/19/20251 min read

नमाड- दि. १९ सप्टेंबर- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध ठिकाणी केलेले वास्तव्य आणि दिलेल्या भेटीचे ठिकाण सर्वांसाठी ऊर्जा केंद्र आहे. या पाऊलखुणा जपण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे. तशा ऐतिहासिक वास्तू आणि वारसा स्थळांचे जतन करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने मनमाड येथील डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रमाला ऐतिहासिक वास्तूचा दर्जा देण्यासह त्या जागेस प्रेरणाभूमी असे नाव देण्याच्या मागणीबाबत महाराष्ट्र शासन सकारात्मक असून याबाबत लवकरच निर्णय घोषित करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिली.

मनमाड येथील प्रेरणाभूमीच्या विषयाबाबत प्रेरणाभूमी विकास कृती समितीच्या शिष्टमंडळाने बनसोडे यांची पिंपरी चिंचवड येथे भेट घेऊन प्रेरणाभूमीच्या मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. या मागण्यांना बनसोडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच मनमाड येथील या ऐतिहासिक भूमीला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वास्तू आणि जागेची पाहणी केली जाईल, असे बनसोडे यांनी यावेळी सांगितले. यासाठी लवकरच विशेष पाहणी दौऱ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यावेळी या ऐतिहासिक वास्तूशी संबंधित सर्व शासकीय कार्यालयांच्या जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रेरणाभूमी विकास कृती समितीचे प्रतिनिधी, नाशिक जिल्हा दलित शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त आणि संबंधित शासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. त्यावेळी सकारात्मक निर्णय घेऊन घोषित केला जाईल, असे बनसोडे यांनी स्पष्ट केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य महान असून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. बाबासाहेबांनी भेट दिलेल्या आणि वास्तव्य केलेल्या स्थळांचे संवर्धन करून त्या जागेचा विकास करण्यावर शासनाने विशेष लक्ष दिले आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील बाबासाहेबांचे निवासस्थान देखील संवर्धित करून त्या जागेचा विकास करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी आवश्यक जागेचे अधिग्रहण करण्याचे काम शासनस्तरावर सुरू आहे. तसेच धुळे येथील लळिंगच्या निसर्गरम्य हिरवाईत असलेला आणि संदेशभूमी म्हणून नावारूपास आलेला लांडोर बंगला (ट्रॅव्हलर बंगला) येथे बाबासाहेबांनी मुक्काम केला होता. ती भूमी आंबेडकरी अनुयायांसाठी अत्यंत जिव्हाळ्याची असून या वास्तूस ऐतिहासिक वास्तूचा दर्जा देण्याबाबत नुकतीच बैठक घेऊन तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे विविध ११ ठिकाणांबाबतदेखील शासनाने सकारात्मक निर्णय घेतले आहेत, अशी माहिती उपाध्यक्ष बनसोडे यांनी यावेळी दिली.

प्रेरणाभूमीच्या अशा आहेत मागण्या..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चार पेक्षा अधिकवेळा मनमाड शहरात आल्याचे दाखले उपलब्ध आहेत. दि.१२ व १३ फेब्रुवारी १९३८ साली येथे बाबासाहेबांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल जी.आय.पी. रेल्वे अस्पृश्य कामगार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच येथे महिलांची परिषद देखील घेतली होती. मनमाड येथील डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रमाला देखील ऐतिहासिक महत्व असून याठिकाणी बाबासाहेबांच्या पाऊलखुणा आणि स्मृती आहेत. मनमाड (ता.नांदगाव, जि.नाशिक) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रम उभारण्यात आले आहे. या वास्तूचे भूमिपूजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते ९ डिसेंबर १९४५ रोजी संपन्न झाले. तर १७ नोव्हेंबर १९५१ रोजी या वास्तूचे लोकार्पण देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झाले होते. पायाभरणी आणि उद्घाटन अशा दोन्ही गोष्टी बाबासाहेबांच्या हस्ते संपन्न झाल्याची ही एकमेव घटना असून मनमाड शहरासाठी ऐतिहासिक ठेवा आहे. राज्यासह राष्ट्रीय पातळीवर या घटनेला अनन्यसाधारण महत्व आहे. बाबासाहेबांनी प्रत्यक्ष येऊन याठिकाणी विचार मांडले आहेत. हा सर्व वारसा जतन करण्याची आवश्यकता असून या वास्तूचे संवर्धन देखील करणे नितांत गरजेचे आहे. ही वास्तू सर्वांसाठी विशेषत: आंबेडकरी जनतेसाठी प्रेरणा देणारे ऊर्जा केंद्र आहे. मनमाड येथील डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रमाचे संवर्धन करून याठिकाणी बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे, या जागेला ‘प्रेरणाभूमी’ असे नाव देऊन ते शासनाच्या वतीने जाहीर करण्यात यावे, या ऐतिहासिक वास्तूचे उद्घाटन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दि. १७ नोव्हेंबर १९५१ साली झाले, तसेच बाबासाहेबांची अनेक प्रेरणादायी भाषणे देखील मनमाड शहरात झाले आहे. या आठवणींचे स्मरण म्हणून १७ नोव्हेंबर हा दिवस ‘प्रेरणादिन’ म्हणून जाहीर करून शासनस्तरावर तो सर्वत्र साजरा करण्यात यावा, या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्ञान संकुल उभारावे, आदी मागण्यांचे निवेदन विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना प्रेरणाभूमी कृती समितीच्या वतीने देण्यात आले. शिष्टमंडळामध्ये दिलीप पगारे, मुकुंद पगारे, शेखर डावरे, माधव केदारे, मनोज बि-हाडे, अॅड. मनीष रणशूर, संजय बनसोडे, किरण गायकवाड आदींचा समावेश होता.

मनमाड येथे प्रेरणाभूमीच्या मागणीसाठी नुकतेच एकदिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आल्याची माहितीही शिष्टमंडळाने उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना दिली. प्रेरणाभूमीबाबत जनतेच्या भावना अतिशय तीव्र असून आंदोलनाला विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याचे पत्र दिले असल्याचेही शिष्टमंडळाच्यावतीने यावेळी सांगण्यात आले.

मनमाड मधील प्रेरणाभूमीसाठी असलेल्या जनभावना विचारात घेऊन डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रमाला ऐतिहासिक वारसा स्थळाचा दर्जा देऊन त्या भूमीस प्रेरणाभूमी असे नाव देण्याच्या घोषणेसह १७ नोव्हेंबर हा दिवस प्रेरणादिन म्हणून शासनस्तरावर साजरा करण्याच्या मागणीसंदर्भात शासनाकडून निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही बनसोडे यांनी शिष्टमंडळाला दिली.